FAIL (the browser should render some flash content, not this).

श्री शंभू महादेवाची आगमन कथा डंगिरेवाडी


दहिवडी नातेपुते या मार्गावरील वावरहिरे या गावापासून पूर्वेस पाच किलोमीटर तसेच म्हसवड शिंगणापूर या मार्गाच्या पश्चिमेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर खूप वर्षांपूर्वी डंगिरेवाडी हे गाव वसलं होत. गावाचा परिसर डोंगरदरयांनी आणि घनदाट जंगलाने वेढलेला होता. अशा या निसर्गसंपन्न परिसरात शेटीबाबा हे गुराखी पारगाव नांदगाव या गावाहून खूप वर्षांपूर्वी आले होते.गावातील काही वैरामुळे रात्री त्यांना गाव सोडून डंगिरेवाडी यथे येऊन रहाव लागल. भक्तीची आवड असणाऱ्या शेटी बाबांनी उदरनिर्वाहासाठी शेळ्या आणि एक गाय पाळली होती. शेटी बाबा दररोज त्या शेळ्या आणि गाय कुरणात चरायला घेऊन जात होते. कुरणात खैर आणि हिवराच्या झाडाला भाकरी अडकवून ते शिखर शिंगणापूरच्या दर्शनासाठी नित्यनियमाने पायी जात. सुमारे सलग बारा वर्षे बाबांनी हा दिनक्रम चुकवला नाही. नंतर वाढत्या वयामुळे त्यांना रोज शिखर शिंगणापूरला जाणे शक्य होईना.

एक दिवशी श्री शंभू महादेव शेटी बाबांच्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले तू माझ्याकडे मला भेटायला येऊ नकोस मी स्वतः तुझ्या शेळ्यांच्या वाडग्यात येत आहे. उद्या सकाळी जिथे तुझी गाय बांधली आहे तेथे माती उकर मी तेथेच आहे. शती बाबांनी दुसऱ्या दिवशी त्याच प्रमाणे केले. शेटी बाबांच्या वाडग्यात श्री शंभू महादेव पिंडीच्या रुपात अवतरले.

आज जी स्वयंभू पिंड पहावयास मिळते ती बाबांनी उकरलेल्या जागेवरच आहे. वाड्ग्याचे ठिकाण महादेवाच्या आगमनाने पवित्र झाले. बाबांनी हळू हळू तेथे मंदिर उभारले. आज मंदिराकडे पाहिलं तर कळस आणि नवीन मंडप वगळता मंदीराच दणकट दगडी बांधकाम बाबांनी त्यांच्या काळात केलं आहे. बाबांनी आणि त्यांच्या पत्नीने अतोनात कष्ट करून हे मंदिर उभारलं होत ते आजही कणखरपणे उभे आहे. आज या मंदिरावरचा आकर्षक कळस आणि मंदिरासमोर भव्य मंडप फंडातून पैसा गोळा करून गोसावीवाडी आणि डंगिरेवाडी ग्रामस्थांनी उभारला आहे.

शेटीबाबांचा कुटुंब:

शेटीबाबांना त्यांच्या सहित चार भाऊ होते. ते चौघेहि वेगवेगळ्या गावी राहत होते. महादेवदरा, मोरंगी, डंगिरेवाडी आणि गोसावी वाडी अशी या गावांची नावे आहेत. हे चारही गावे एकमेकांची भावंडे आहेत. गोसाविवाडीतील लोकांना फक्त श्री शंभू महादेवाची पूजा करण्याचा अधिकार आहे.

शेटीबाबा जसे मोही गावाच्या हद्द्दीत असलेल्या कुरणात शेळ्या आणि गाय चरायला घेऊन जात होते तसेच ते वावरहिरे गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात शेळ्या व गाय चरायला घेऊन जात होते. सध्या या जंगलात गोसाविवाडी हे गाव वसले आहे. सध्या येथे जंगल नाही पण तुरळक झाडे आहेत. या गावात एक विटेची विहीर आहे. हि विहीर पाहून तेथेच एक झोपडी तयार करून बाबा राहू लागले. आजही गोसाविवाडी येथे ती विटांची विहीर असून बाबांच्या वास्तवाची साक्ष देताना दिसते. बाबा इथ राहून डंगिरेवाडी येथील शंभू महादेवाची पूजा करू लागले.

डंगिरेवाडीत पारगाव नांदगावहून शेटी बाबा आले
आपल्या पोरापरी प्रेम त्यांनी शेळ्या, गायींना दिले
अचाट त्यांची शक्ती, श्रद्धा भक्ती महादेवावर
प्रात संध्या पायी वारी त्यांची थेट शिखर शिंगणापूर

असा रोजचा त्यांच्या दिनक्रम श्री शंभूला भेटायचा
वर्षानुवर्ष गेली उलटून कधी नाही चुकवायचा
वृद्धापकाळात त्यांच्या दिनचर्येला तडा गेला
स्वत: श्री शंभू महादेव त्यांना भेटायला आला

माझ्या प्रिया भक्त धन्य तुझी भक्ती
आलो मी इथे तुझ्या मायेचीच शक्ती
उद्या तुझ्या वाडग्यात प्रकटतो तुला भेटाया
पहाटे सुरवात कर तू वडगा उकराया

पहाटे उठून शेटी बाबा वाडग्यात गेले
उकरताच वाडगा शंभू त्यांना भेटाया आले
त्यांच्या वाडग्यात श्री शंभूची पिंड अवतरली
त्यांच्या निखळ भक्तीची कीर्ती जगभर पसरली

त्याच जागी बाबांनी श्री शंभूचे मंदिर बांधले
धन्य शेटीबाबा भक्ताने देवास डंगिरेवाडीत आणले
खरच शांत, निर्मल देवस्थान, थंडावाहि भरपूर
श्री शंभूचे दर्शन होते हे तर प्रती शिखर शिंगणापूर

नवस पूर्ण होती सारी विघ्ने होती दूर
हेच मोठा महादेवाचे प्रती शिखर शिंगणापूर
हेच मोठा महादेवाचे प्रती शिखर शिंगणापूर ......