FAIL (the browser should render some flash content, not this).

डंगिरेवाडी परिसर


डंगिरेवाडी हे गाव डोंगरांनी वेढलेले आहे. अशाच एका डोंगराच्या पायथ्याशी डंगिरेवाडी हे गाव वसलेले आहे. गावातील मंदिरही डोंगराच्या कडेला पूर्वेकडे तोंड करून आहे. मंदिराच्या चारही बाजूस भिंत उभी करण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात पुजारी काकांचे घर आहे. मंदिराच्या लोखंडी दरवाजातून प्रवेश करताच एक अशोकाचे झाड लागते. त्या झाडावर गोमुत्राचे भांडे टांगलेले आहे. प्रत्येक भाविक मंदिरात शिरताच गोमुत्र आपल्या अंगावर शिंपडतो. पुराणात लिहिल्याप्रमाणे गोमुत्र पवित्र असते त्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी गोमुत्र अंगावर शिंपडतो आणि शुद्ध होतो.मंदिरात शिरताच एक तुळशी वृंदावन आहे. तेथून काही पायऱ्या खाली उतरताच मंदिराच्या बह्याभाग लागतो. तेथून घंटानाद करून पुढे येताच मंदिराचे प्रवेशद्वार लागते. पुढे मंदिरात प्रवेश करताच तीन नंदी दिसतात. नंदीच्या शिंगांवर सुंदर गोंडे बसवलेले आहेत. डावीकडून मंदिरात प्रवेश करताच गणपतीची सुरेख मूर्ती आहे. गणपतीच्या पाया पडून मंदिराच्या आंतरगाभाऱ्यात प्रवेश करताच डावीकडे एक नगारा ठेवला आहे. पूजा चालू असताना त्या ढोलाचा उपयोग केलं जातो. एक छोटासा दरवाजा ओलांडताच आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात येतो. तेथे श्री शंभू महादेवाचे आपणास दर्शन होते. मंदिराच्या बाह्य गाभाऱ्यातल्या खिडकीतून उत्तरेला पाहिल्यास थेट शिखर शिंगणापूर दर्शन होते.

श्री शंकराच्या मंदिराच्या डावीकडे श्री विठ्ठल रुखुमाई चे लहानसे मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो. विठ्ठल रुखुमाई चे दर्शन घेऊन पुढे येताच आपणास लहान हनुमानाची मूर्ती दिसते. हि मूर्ती लाल शेंदूर लावून सजवली आहे. दर शनिवारी लोक रुईच्या पानांचा हार व तेलाने हनुमानाची पूजा करतात. मंदिराच्या उजव्या बाजूला शेटी बाबांचे समाधी मंदिर आहे. यात शेटी बाबांची पादुकारूपी समाधी आहे.

मंदिराच्या संपूर्ण आवारात लादी बसवलेली आहे. पुजारी काका रोज हा परिसर स्वतः स्वच्छ करतात. मंदिरात प्रवेश करताच वातावरण अगदी मनाला प्रसन्न करणारे वाटते. मंदिराच्या पुढेच डोंगराला लागून एक विहीर आहे. हि देवाची विहीर आहे. देवासाठी लागणारे सर्व पाणी या विहिरीतूनच वापरले जाते. विहिरीच्या भोवताली चाफा व बेलाची झाडे आहेत. रोज सकाळी व संध्याकाळी पूजेसाठी येथूनच चाफ्याची फुले व बेल घेतला जातो. जवळच एक उदाचे झाडही आहे.

डंगिरेवाडी हे देवस्थान मुख्य मार्गापासून आत असल्यामुळे ते प्रसिद्धीपासून वंचित आहे पण येथे शंभू चे दर्शन घेतल्यावर मनाचा सर्व थकवा निघून जातो आणि मन शांती मिळाल्याचा अनुभव आपल्याला येतो.

यानंतर आम्ही या पानावर काही चित्रांचा समावेश केला आहे. ज्यामुळे डंगिरेवाडीच्या सुंदर परिसराची तुम्हाला कल्पना येईल.