FAIL (the browser should render some flash content, not this).

डंगिरेवाडी पुजारी काकांचा दिनक्रम


श्री शंभू महादेवाचे पुजारी दररोज सकाळी (पहाटे) व संध्याकाळी देवाची पूजा करतात. पूजेच्या वेळी पुजाऱ्याच्या अंगावर फक्त काळ्या घोंगड्याची लंगोटी असते. पहाटे चार वाजता शंभो हर हर महादेव असा गजर करत श्री शंभू महादेवाला जागे केले जाते. पूजा संपताच पुजारी संपूर्ण मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ करतात. गावात पुजारी नित्यनियमाने पीठ मागायला (माधुकरी) जातात. त्यानंतर महादेवाची पूजा केली जाते.दही भाताच्या पूजेच्या दिवशी किव्हा भंडाऱ्याच्या दिवशी पुजारी संपूर्ण स्वयंपाक सोवळ्यात (काळ्या घोंगड्याच्या लंगोटीत) करतात. त्यानंतर दही भाताची पूजा पिंडीवर बांधतात. हा दिवसभराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा सोवळ्यात केली जाते. देवाच्या पूजेसाठी लागणारे पाणी पूर्वी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीतून आणले जाई. आता मंदिराजवळच पूर्वेला एक विहीर आहे तेथून पुजारी पाणी आणतात. विहिरी जवळच चाफा, कान्हेर, बेल यांची भरपूर झाडे आहेत. तेथून पूजेला लागणारी बेल व फुले आणली जातात.

देवाची पूजा करण्यासाठी प्रत्येक वर्षी नवीन पुजारी येतात. शेतीचा व्यवसाय सांभाळत पुजारी गोसाविवाडी येथून येऊन डंगिरेवाडी येथे संन्यासी होऊन राहतात व देवाची भक्तीभावाने पूजा करतात. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी त्याच पूजाऱ्याना हि संधी पुन्हा मिळते. सर्व पुजारी या संधीला सोनं आणि पूर्वजांची कृपा व आशीर्वाद मानतात.

श्रींची पूजा:

पुजारी काका सकाळी उठल्यावर (पहाटे) घोंगड्याची लंगोटी घालून तांब्याचा तांबडा तांब्या व त्याच रंगाची कळशी घेऊन विहिरीवर जातात. तेथे अंघोळ करून त्या विहिरीचे पाणी घेऊन मंदिरात शंभो हर हर महादेव असा गजर करत प्रवेश करतात. पिंडीजवळ कळशी, तांब्या ठेऊन पिंडीसहित आतील व बाहेरील देवासाठी चंदनाचा गंध, बेल, फुलांची करंडी व पाण्याचा तांब्या घेऊन सर्व देवांना अंघोळ घालतात. देवांना चंदनाचा गंध, बेल, फुल वाहतात. नैवैद्य म्हणून शेंगदाणे ठेवतात.

हा पहाटेचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य पूजा असते. या पूजेत स्वयंभू पिंडीवर रात्री वाहिलेली फुले एका बाजूला काढून देवाचे नामस्मरण करीत देवाला पाण्याने धुऊन काढतात. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी देवाला पुसून देवाला चंदनाचं भस्म आणि हळद, कुंकू स्वयंभू पिंडीला व इतर देवांना लावतात. मग पुजारी घरी जाऊन धूप आरती मध्ये विस्तव आणतात. त्या विस्तवात उद, धूप टाकतात. त्याच वेळी एक कापराची वडी लाऊन एका हातात घंटी व एका हातात धुपारती घेऊन जोरात शंभो महादेव अशी आरोळी देतात. मुख्य गाभाऱ्यातून सरळ बाहेर येऊन मंडपासमोरील तुळशी वृन्दावनासमोर शंभो हर हर अशी देवास हाक मारतात.

नंतर त्याच मार्गाने डावीकडे असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात, तसेच पुढे येऊन मारुतीच्या मंदिरात जातात. त्यानंतर तेथून प्रदक्षिणा पूर्ण न करताच परत मंडपात येतात. मंदिरात न जाता उजवीकडे असणाऱ्या शेटीबाबांच्या मंदिरात जातात. प्रत्येक मंदिरात प्रवेश करताच पूजा करताना शंभो हर हर महादेव अशी हाक ते देवाला मारतात. शेटीबाबांच्या मंदिरात पुजारी शंकराची आरती म्हणतात. नंतर प्रदक्षिणा पूर्ण करून बाह्य गाभाऱ्यातील नंदिजवळ येतात तेथून त्यांना थेट शिखर शिंगणापूरचे दर्शन होते. शिखर शिंगणापूरकडे पाहत ते पुन्हा हर हर महादेव असा गजर करतात. नंतर मुख्य दरवाजात आणि गाभाऱ्यात शंभो महादेव अशी हाक देतात आणि देवाची पूजा तेथे संपते. त्यानंतर शंख वाजवून पुन्हा एकदा शंभो हरहर महादेव अशी हाक मारून देवाच्या पूजेची सांगता करतात.

त्यानंतर पुजारी मंदिराचा आणि मंदिराच्या आवारातील परिसर पाण्याने स्वच्छ धुतात. नंतर नैवैद्य म्हणून स्वयंपाक करतात. स्वयंपाकातील भाकरी, भात आणि चपाती तांब्याच्या तांबड्या ताटात झाकून नेतात. त्याचा ताटातील जीन्नसाचा नैवैद्य पुजारी देवाला दाखवतात. दही भाताचा नैवैद्य महादेवाबरोबरच, मंदिराच्या सभोवताली असणाऱ्या महलक्ष्मि मंदिरात, लीम्बाबा, म्हसोबा, देवाची विहीर, घरातील पेटीचुलीला दाखवतात. या नंतर दुपारचा कार्यक्रम संपतो.

संध्याकाळी सुद्धा सकाळी ज्याप्रमाणे पूजा केली त्याच प्रमाणे पूजा केली जाते अपवाद असतो तो फक्त नैवेद्याचा. रात्रीची पूजा झाल्यानंतर झोपताना पुजारी महादेवाचे मंदिर आणि शेटीबाबांचे मंदिर बंद करतात. दुसऱ्या दिवशी देव जागे करताना पुजारी पुन्हा दरवाजे उघडतात.

श्रींचा नैवैद्य:

श्रींच्या नैवेद्यासाठी भाकरी, भात किव्हा चपाती यापैकी कोणताही एक पदार्थ सकाळी आठच्या दरम्यान केला जातो. पूर्वी पुजारी देव जागा केल्यानंतर दररोज परिसरातील वस्तीवर जाऊन पीठ मागत असत. त्या मागून आणलेल्या पिठाची भाकरी बनवून तिचा नैवेद्य दाखवत होते. आताही पीठ मागून आणून नैवेद्य करण्याची पद्धत आहे. प्रत्येक सणाला पीठ मागण्यासाठी जावेच लागते. पीठ मागून आणण्याचा एकाच हेतू असतो. प्रत्येकाला देवाला नैवेद्य दाखवणे शक्य नसते त्यामुळे प्रत्येकजण पुजार्यांना पीठ वाढतात आणि त्याचा नैवेद्य पुजारी महादेवास दाखवतात. तसच आपल्या शेतात काही पिकात असेल तर ते हि देण्याची पद्धत आहे. (भाजीपाला, फळ, धान्य, दूध, दही)