FAIL (the browser should render some flash content, not this).

डंगिरेवाडी श्री शंभो महादेवाचे कार्यक्रम


डंगिरेवाडी येथे वर्षभर अनेक कार्यक्रम राबवले जातात. या सर्व कार्यक्रमात सर्वजन सहभागी होऊन देवाच्या सेवेचा आनंद लुटतात.वैशाखी भंडारा:

वैशाख महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात हा पहिला देवाचा भंडारा केला जातो. वैशाखी भंडारा म्हणजे देवाची पूजा करून देवाचा नैवेद्य लोकांना वाटणे पण इतर भंडाऱ्या प्रमाणे हा भंडारा कुणा एकाचा नसून तो पूर्ण डंगिरेवाडीवासी करतात. सकाळी सर्व गावकरी मिळून पूर्ण मंदिर, त्याचा कळस, आणि परिसर पाण्याने स्वच्छ धुऊन काढतात. गावातील सर्व स्त्रिया एकत्र येऊन पोळ्या करतात. आजूबाजूच्या गावालाही पोळ्याचे चुलबंद आमंत्रण असते.

भंडाऱ्याच्या प्रसादाचे प्रमाण ठरलेले असते. त्यात एक शेर कणी, एक मापट डाळ, एक चीपाट तांदूळ आणि प्रत्येक घरातून पंधरा रुपये वर्गणी घेतली जाते. सकाळी गावातील सर्व लहान मुले, पुरुष मंडळी, तरुण वर्ग मंदिर स्वच्छ धुऊन काढतात. त्यानंतर श्री शंभो महादेवाला अभिषेक करून दही भाताची पूजा बांधली जाते. संध्याकाळी जेवणाच्या पंगती बसवल्या जातात. या वैशाखी भंडाऱ्यानंतर वैयक्तिक लोकांच्या नवसपूर्तीच्या भंडाऱ्याना सुरुवात होते.

कळस जयंती:

कळस जयंतीच्या दिवशी सकाळी महादेवाच्या पूजेनंतर दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालतो. संध्याकाळी गोसावी वाडीच्या नागरिकांतर्फे लाडूंचा भंडारा केला जातो.

हरीनाम सप्ताह:

श्रावण महिन्यात दरवर्षी ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते. पारायानाबरोबर सातही दिवस मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम केले जातात. हरीनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते.

श्रींचा विवाह:

श्रींचा विवाह हा सुद्धा मोठ्या उत्साहाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक पुजारी हा कार्यक्रम मोठा थाटामाटात करतात. चैत्र पंचमीला श्रींची हळद असते तर अष्टमीला श्रींचा विवाह असतो. पूर्वी स्वयंपाक घरासमोर करंजाच्या झाडाच्या फांदयाच्या डहाळयांचा मंडप घालत होते. आता नव्या पद्धतीने मंडप घालून लाउड स्पीकर लावतात. श्रींना संपूर्ण पूर्ण पोशाख घालून बाशिंग बांधतात. जसा आपल्या घरच्या विवाहाचा कार्यक्रम असतो अगदी तसाच हा उत्सव असतो.

श्रींची बाशिंगे आणण्याचा मान लोंडयाचीवाडी येथील ननावरे यांच्याकडे आहे. ननावरे डंगिरेवाडीमध्ये बाशिंग घेऊन आले कि त्यांचा रीतीरिवाजानुसार मानपान केले जाते. वास्तविक ननावरे यांनी आम्ही जोपर्यंत असू तो पर्यंत देवाला बाशिंग पुरवणार असा नवस केला आहे. त्यामुळे अशी पद्धत दर वर्षी पाळली जाते.

श्रींचा विवाह झाल्यानंतर पुजारी बदलतात. चैत्र पौर्णिमेपर्यंत नवीन पूजारी येतात व जुन्या पूजारयांकडून त्यांच्या सालची माहिती घेऊन सर्व कारभार ताब्यात घेतात. नवसाला पावणारा शंभो महादेव अशी ख्याती असणाऱ्या डंगिरेवाडीच्या महादेवाच्या मंदिरात सतत दहीभाताच्या पूजा आणि भंडारा असे कार्यक्रम होत असतात. सोमवार, गुरुवार, शनिवार, अमावस्या, महाशिवरात्री, एकादशी या दिवसात भाविकांच्या गर्दीने डंगिरेवाडीचा परिसर अगदी फुलून जातो. त्यामुळेच डंगिरेवाडीला प्रती शिखर शिंगणापूर असा म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

लक्ष्मी आईचे मंदिर:

महादेवाच्या मंदिराला लागुनच लक्ष्मी आईचे मंदिर आहे. वाघावर बसलेली देवी अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी आहे. डंगिरेवाडीतील गावकऱ्यांनी देणगी गोळा करून हे मंदिर बांधले आहे.लक्ष्मी आईची सेवा करण्याची अनुमती जवळच्या मोरांगी गावाला आहे.

मोरांगी गावातील सुवासिनी देवीला पाणी घालण्यासाठी रोज सकाळी येतात. तसेच रोज संध्याकाळी त्या गावातील पुरुष सांजवात लावण्यासाठी लक्ष्मी आईच्या मंदिरात येतात. मोहीच्या देवीची प्रतिरूप म्हणून डंगिरेवाडीच्या लक्ष्मी आईला मानतात. आजूबाजूच्या गावातील देवर्षीस्त्रिया देवीची सेवा करतात.